माथेरानचा शार्लेट लेक ओव्हरफ्लो धबधबा पर्यटकांसाठी खुला

पर्यटकांचे खास आकर्षण असलेला माथेरानमधील शार्लेट लेक ओव्हरफ्लो झाला असून हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात भर पडली आहे. पर्यटकांच्या आनंदात विरजण पडू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने धबधब्यावर दोन कर्मचारी तैनात केले आहेत.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यटक पहिली पसंती देतात. मात्र पावसाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पावले शार्लेट लेकच्या धबधब्याकडे वळतात. मात्र वाढत्या दुर्घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाकडून सर्व तलाव, धबधबे येथे जाण्यास बंदी घातली होती. त्यानंतर येथील स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, स्थानिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा धबधबा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती, त्यानंतर पर्यटन वाढीसाठी माथेरान नगरपालिकेने हा शार्लेट लेकचा धबधबा पर्यटकांसाठी खुला केला आहे.

सुरक्षारक्षक तैनात
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या धबधब्यावर दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षा यंत्रणेसाठी टेंडर काढण्यात येणार असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणखी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिली.