
कोपरखैरणे येथील रिलायन्स फाऊंडेशन शाळा आणि महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारी कियारा लुईस हिची रिसर्च सायन्स इनिशिएटिव्ह-इंडिया (आरएसआय-इंडिया) 2025 या उपक्रमात संशोधनासाठी निवड झाली आहे. हा उपक्रम अमेरिकेतील सेंटर फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन (सीईई) आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) यांच्या सहकार्यातून सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशभरातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. 15 जूनपासून सुरू झालेला हा उपक्रम येत्या 26 जुलैपर्यंत चाल णार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एसटीईएम क्षेत्रात प्रगत संशोधनात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमासाठी कियारा लुईस या विद्यार्थिनीची निवड झाल्याने नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या उपक्रमात कियाराने गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली. तिला रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका प्रतीक्षा राजाध्यक्षा आणि स्टुडंट केअर सर्व्हिसेसच्या विभागप्रमुख अभिता गडा यांनी विशेष मार्गदर्शन केले.