शहापुरात जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितीच्या दोन जागा वाढणार, प्रभाग रचनेची जुलैपासून लगीनघाई; संभाव्य उमेदवारांची जोरदार लॉबिंग

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी अधिसूचना जाहीर केली असून प्रभाग रचनेच्या कामाची जुलैमध्ये युद्धपातळीवर लगीनघाई सुरू होणार आहे. सद्यस्थितीत शहापूर 14 गट व 28 गण आहेत. मात्र दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितीच्या दोन जागांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.

प्रशासकीय राजवटीत असलेल्या आणि मुदत संपलेल्या अनेक पालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद 15 आणि पंचायत समित्यांच्या 30 जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 14 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत प्रभाग रचनेसाठी अधिसूचना जाहीर केली असून प्रभाग रचनेची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रभाग रचना, आरक्षण, प्रभाग यादीचे विभाजन अशा मुख्य तीन टप्प्यात कार्यवाही होणार आहे.

प्रभाग रचना आपापल्या सोयीची कशी करता येईल यासाठी ठिकठिकाणच्या प्रभागात बैठका सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी यात आघाडीवर असून यंत्रणा राबवून उमेदवारांचा मार्ग कसा सुकर करता येईल याकरिता अदृश्य हात कामाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे भविष्यात वादाची राळ उठण्याची शक्यता आहे,

प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना 14 जुलै, जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर 21 जुलै, प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना अहवाल सादर – 28 जुलै, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन 11 ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात येणार आहे. अंतिम प्रभाग मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

तालुक्यातील सर्व प्रभाग रचना सूत्रानुसार झाल्यावर वाढलेल्या मतदारांच्या संख्येनुसार गट व गणाची नावे कळतील. यासाठी लवकरच प्रभाग रचनेचे काम सुरू होणार आहे.
परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर