मल्टिवर्स – द रिअल स्टील

>> डॉ.  स्ट्रेंज

दोन वेगवान, ताकदवान, हुशार रोबोट एकमेकांशी लढताना पाहण्यात जो थरार आहे तो अंगावर रोमांच उभे करतो. तंत्रज्ञानाच्या जोडीला बाप बेट्यात फुलत जाणारे प्रेम, चार्लीचा परत येत असलेला आत्मविश्वास, त्याच्या आयुष्यात पुन्हा आलेले प्रेम आणि एका निष्काळजी बॉक्सरचा एक कर्तृत्ववान पिता म्हणून या काळात होणारा प्रवास हे पडद्यावर पाहणे म्हणजे एक सुरेल असा अनुभव आहे.

रोबोट अर्थात यंत्रमानव हे जगभरातील चित्रपट निर्मात्यांचे अत्यंत आवडते पात्र. रोबोटला मध्यवर्ती ठेवून अनेक कथा रचल्या गेल्या, अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली गेली. रोबोट मग नायकाच्या भूमिकेत असो अथवा खलनायकाच्या, त्याच्या प्रसिद्धीला कधी ग्रहण लागले नाही. कधी पूर्ण रोबोट, कधी अर्धा मानव आणि अर्धा रोबोट तर कधी मानवाप्रमाणे भावभावना निर्माण झालेला रोबोट, अशा अनेक प्रकारच्या पात्रांची रचना चित्रपटसृष्टीने केली. कधी कधी या रोबोटना खलनायकाच्या भूमिकेतदेखील सादर केले गेले आणि त्या पात्रांनीदेखील प्रेक्षकांची दाद मिळवली. रोबोटच्या चाहत्यांना एक प्रचंड आवडता चित्रपट म्हणजे रिअल स्टील. मानवी नातेसंबंधातली गुंतागुंत आणि तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार म्हणजे हा चित्रपट.

2011 साली आलेल्या ‘रिअल स्टील’ चित्रपटात भविष्यातील अर्थात 2020 चा काळ दाखवला आहे. 2020 मध्ये मानवी बॉक्सिंगचा खेळ पूर्णपणे संपुष्टात आलेला असतो आणि मानवी बॉक्सरची जागा आता रोबोट बॉक्सरने घेतलेली असते. अशा अनेक रोबोट बॉक्सरच्या कायदेशीर आणि बेकायदेशीर लढती जगभरात होत असतात. मानवाच्या जागी रोबोट आले तरी खेळाचे नियम मात्र तेच असतात. अगदी बेकायदेशीर बॉक्सिंग मॅचेसवर सट्टादेखील लावला जात असतो. या रोबोटमुळे अनेक मानवी बॉक्सर मात्र बेरोजगार बनलेले असतात. चार्ली हा असाच एक बेरोजगार आणि बेफिकीर बॉक्सर. एका जुन्या बॉक्सर रोबोटच्या मदतीने तो त्याच्या लढाया इतर रोबोट बॉक्सरसोबत लावत असतो आणि थोडे फार पैसे कमावत असतो. एकदा तो पैशासाठी त्याच्या रोबोट बॉक्सरची लढत एका बैलासोबत लावतो आणि निष्काळजीपणामुळे ती लढत तर हरतोच, पण त्याचा रोबोट बॉक्सरदेखील भंगारात जमा होतो.

मॅच हरल्याने आधीच कर्जात असलेला चार्ली अजून कर्जात बुडतो. त्यातच त्याला कोर्टाकडून समन्स येते. चार्लीची एक्स गर्लफ्रेंड मृत पावलेली असते आणि आता तिच्या मुलाचा पालक म्हणून चार्लीला जबाबदारी घ्यायची असते. सडाफटिंग असलेल्या चार्लीला तो त्याचा मुलगा असूनदेखील त्याच्याबद्दल फारसे ममत्व नसते. मात्र कोर्टाचा आदेश असल्याने जाणे भाग पडते. कोर्टात त्याच्या मेलेल्या गर्लफ्रेंडची काकू त्या मुलाला सांभाळण्याची तयारी दाखवते आणि त्याची मागणी करते. लोभी चार्ली मात्र आधी खोटी माया दाखवत नकार देतो, मात्र नंतर एक लाख डॉलर्सच्या बदल्यात तयारदेखील होतो. मात्र ही काकू काही दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याने त्या मुलाचा अर्थात मॅक्सचा सांभाळ काही दिवस चार्लीला करावा लागतो.

एका विचित्र प्रसंगात या बाप बेट्याच्या हाताला अॅटम नावाचा एक जुना रोबोट लागतो. भंगारात टाकून दिलेला हा रोबोट ते घरी घेऊन येतात. किरकोळ वाटणाऱ्या या रोबोटमध्ये अजूनही कार्यरत राहण्याची ताकद पाहून ते हरखून जातात. अॅटममध्ये आवाज ऐकण्याची, शॅडोबॉक्सिंग करण्याची देखील खासियत आहे हे बघून ते आश्चर्यचकित होतात. आता दोघेही अॅटमचे प्रशिक्षण सुरू करतात. स्वत एकेकाळी बॉक्सर असलेला चार्ली आता नव्या उमेदीने अॅटमला बॉक्सिंग शिकवायला लागतो. काही काळातच वेगवेगळय़ा रोबोट बॉक्सरचा पराभव करत अॅटम लोकांच्या गळय़ातला ताईत होतो आणि एक दिवशी मॅक्स चक्क जगज्जेत्या रोबोट बॉक्सरला अॅटम विरुद्ध लढण्याचे आव्हान देतो.

एकही सामना न हरलेला जगज्जेता रोबोट बॉक्सर झूस आणि किरकोळ भासणारा अॅटम जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा कथेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स आपल्याला धक्का देऊन जातात. दोन वेगवान, ताकदवान, हुशार रोबोट एकमेकांशी लढताना पाहण्यात जो थरार आहे तो अंगावर रोमांच उभे करतो. तंत्रज्ञानाच्या जोडीला बाप बेटय़ात फुलत जाणारे प्रेम, चार्लीचा परत येत असलेला आत्मविश्वास, त्याच्या आयुष्यात पुन्हा आलेले प्रेम आणि एका निष्काळजी बॉक्सरचा एक कर्तृत्ववान पिता म्हणून या काळात होणारा प्रवास हे पडद्यावर पाहणे म्हणजे एक सुरेल असा अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येकाने एकदा नक्की अनुभवावा.