
यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून रस्त्याची ठिकठिकाणी अक्षरशः चाळण झाली आहे. तब्बल 12 वर्षे उलटून गेल्यानंतरही महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झालेले नाही. या कामात हलगर्जी करणारे सरकार कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहतेय का, असा संतप्त सवाल करीत कोकण विकास समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना रोखठोक पत्र लिहिले आहे. रस्त्याचे काम जमत नसेल तर प्रवाशांना 1 कोटीचे विमा संरक्षण द्या, अशी मागणी समितीने केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, इंदापूर विभाग, चिपळूण, आरवली, संगमेश्वर, हातखंबा अशा कित्येक भागातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर-माणगाव बाह्यवळण, पळस्पे इंदापूर पट्टय़ातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल आदी ठिकाणी चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे या परिसरात वाहनचालकांना कित्येक तास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्याचीही अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्गावरील हा खड्डय़ांचा प्रवास टाळण्यासाठी अनेक वाहनचालक पर्यायी मार्गाचा अवलंब करीत आहेत. मात्र त्यात त्यांचा वेळ व इंधनाचा अपव्यय होत आहे, याकडे लक्ष वेधत कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.
गाडय़ांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी मोठा खर्च
महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे कॉंक्रिट वा डांबर अस्तित्वात नसल्यामुळे वाहनचालकांना चिखलातून गाडी चालवावी लागत आहे. यात गाडी जोरजोरात आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्त्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार घडत आहेत.
भरपाई, विमा कवच द्या
मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसानभरपाई म्हणून प्रत्येक फेरीला विशिष्ट रक्कम द्यावी तसेच अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने प्रत्येक प्रवाशाला 1 कोटीचे जीवन विमा संरक्षण व वैद्यकीय उपचारांसाठी 50 लाखांचा विमा उपलब्ध करून द्यावा, यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच बांधलेल्या टोलनाक्यांचा वापर करावा, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.