
नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळय़ाच्या मुद्दय़ावरून मालेगावचे एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर विधानसभेत हल्लाबोल केला. नाशिकमध्येच शालार्थ आयडी घोटाळे मोठय़ा प्रमाणात झाले आहेत. तुमच्या नाकाखालीच घोटाळे होत आहेत, असा आरोप केला. अखेर दादा भुसे यांनी या घोटाळय़ाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले.
शालार्थ आयडीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना भाजप आमदार प्रवीण दटके म्हणाले की, या घोटाळय़ात एकट्या नागपूर विभागात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. राज्याचा आकडा फार मोठा आहे असे सांगत दटके यांनी, 2012 पासून अनेक अपात्र शिक्षकांनी पगारापोटी कोट्यवधी रुपये सरकारचे घेतले असा आरोप केला आणि या घोटाळ्याची चौकशी गांभीर्याने होत नसल्याची टीकाही केली. शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे, पण त्यात आज सर्वाधिक भ्रष्टाचार आहे.
दादा भुसे म्हणाले की, याप्रकरणी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. नागपूर प्रकरणात तपास सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशीत जे कोणी दोषी आढळून येतील त्यांवर कारवाई करण्यात येईल, या प्रकरणात दोषींकडून शासकीय निधीचा अपहार झाल्याचे समोर आले असून, या निधीची वसुली दोषींकडून करण्यात यावी, अशी मागणीही अनेक आमदारांकडून करण्यात आली. त्यावर दादा भुसे यांनी एसआयटी चौकशीअंती याबाबतही अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.