‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ बाबा कल्याणी यांना जाहीर

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबा एन. कल्याणी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी प्रतिष्ठानचे सदस्य मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र माने, विजय साळुंखे, रेश्मा कोरे, अल्ताफहुसेन मुल्ला, शोभा पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. गुजर म्हणाले, ‘कराडचे सुपुत्र स्व. पांडुरंग दादासाहेब पाटील तथा पी. डी. पाटीलसाहेब यांच्या गौरवार्थ पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सांस्कृतिक व सामाजिक कार्य करीत आहे. प्रतिष्ठान सन 2011 पासून हा पुरस्कार देत आहे. ज्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर नेली, अशा व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन 2011 सालचा प्रथम पुरस्कार शास्त्र्ाज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला होता. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये बाबा कल्याणी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, स्व. पी. डी. पाटील यांच्या पुण्यतिथीदिवशी दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे डॉ. अशोक गुजर यांनी सांगितले.