दैव बलवत्तर म्हणून 28 प्रवासी बचावले, डहाणूच्या कवडासजवळ एसटी गेली खड्ड्यात; 14 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

डहाणूच्या एसटी आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसला आज सकाळी सवानऊच्या सुमारास कवडास धरणाजवळील वळणावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट खड्ड्यात गेली. केवळ दैव बलवत्तर म्हणून 28 पदाधिकारी बचावले असून त्यातील 14 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर असून या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

डहाणू-जव्हार राज्य मार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे बस जात असताना एका वळणावर अचानकपणे समोरून येणाऱ्या अवजड वाहनाने कट मारली. रस्त्याच्या कडेला बकऱ्यांचा कळप असल्याने चालक अर्जुन अनाखे यांनी बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने ही बस थेट डाव्या बाजूला कलंडून थेट खड्यात गेली. जोरात मोठे हादरे बसल्याने आतील प्रवासी एकमेकांवर आदळले. सामानही विखुरले गेले. लहान मुले तर रडायला लागली. चालक अर्जुन अनाखे व वाहक सतीश भारती यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

झाड ठरले देवदूत

एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडताच तेथे असलेल्या आंब्याच्या व सागाच्या मोठ्या झाडांमुळे बस अडकली अन्यथा ती 25 ते 30 फूट खोल खड्यात कोसळली असती. या झाडामुळेच आम्ही बचावलो अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

– या दुर्घटनेमध्ये 14 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी लक्ष्मी ओझरे व शोभा मेंडगे यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांच्या पायाला व तोंडाला किरकोळ मार बसला आहे. अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. अपघात घडताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्यात भाग घेतला.