त्या कम्युनिस्ट वेड्याला मी न्यूयॉर्कचा विनाश करू देणारा नाही, ट्रम्प यांची ममदानींवर तीव्र शब्दांत टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी ममदानी यांना ‘कम्युनिस्ट वेळा’ म्हटलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया मंच ‘ट्रुथ सोशल’वर एका पोस्टमध्ये लिहीत म्हटलं आहे की, “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून, मी या कम्युनिस्ट वेड्याला न्यूयॉर्कचा विनाश करू देणार नाही. खात्री बाळगा, माझ्याकडे सर्व साधने आणि सर्व कार्ड्स आहेत. मी न्यूयॉर्क शहराला वाचवेन आणि पुन्हा ग्रेट बनवेन, ज्याप्रमाणे मी संपूर्ण अमेरिकेला केले.” असं असलं तरी त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ममदानी यांचं नाव घेतलेलं नाही.

दरम्यान, ममदानी यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता घेतलेल्या भूमिकेमुळे आता दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ममदानी यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मला अटक करण्याची, माझे नागरिकत्व काढून घेण्याची, मला तुरुंगात टाकण्याची आणि देशातून हद्दपार करण्याची धमकी दिली आहे. हे सर्व मी कोणता कायदा मोडला म्हणून नव्हे, तर मी इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंटला (ICE) आपल्या शहरात दहशत पसरवू देणार नाही, यामुळे.” ममदानी यांनी पुढे म्हटले की, ट्रम्प यांचे हे वक्तव्य केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर प्रत्येक त्या न्यूयॉर्कवासीयावर हल्ला आहे, जो आपले मत मांडण्यासाठी उभा राहतो.

ममदानी हे मूळचे युगांडामधील हिंदुस्थानी वंशाचे आहेत. त्यांनी 24 जून 2025 रोजी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरी निवडणुकीत माजी गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांचा पराभव करत इतिहास रचला. त्यांनी 43.5 टक्के मते मिळवली, तर क्युमो यांना 36 टक्के मते मिळाली. ममदानी जर नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या मुख्य निवडणुकीत विजयी झाले, तर ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ठरतील.