
एअर इंडियाच्या अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एका विमान दुर्घटनेतून प्रवासी थोडक्यात वाचले. चीनमधील शांघाय विमानतळावरून टोकियोला जाणाऱया बोईंग 737 या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला अन् 191 जणांचा जीव टांगणीला लागला. कारण, शांघाय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 10 मिनिटातच विमान तब्बल 26 हजार फूटांवरून वेगाने खाली आले. विमानातील 191 जणांना आपला हा प्रवास अखेरचा असल्याचा भास काही क्षणापुरता झाला. काहींनी इच्छापत्र लिहिले तर काहींनी बँकेचा पिन कोड शेअर केला. जगाच्या निरोपाची तयारी केली, पण त्यांची वेळ आली नव्हती. पायलटने आपले कसब दाखवत सुखरुप लंडींग केले. आपण जिवंत आहोत, यावर विश्वास ठेवणेही प्रवाशांना अद्याप कठीण जात आहे.
बिघाड झालेले विमानदेखील बोईंग ड्रीमलायनर असल्याचे समजते. जपानच्या स्थानिक वेळेनुसार 1 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता हे विमान शांघायहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अचानक कॅबिन प्रेशर कमी झाल्याचा अलार्म वाजला. प्रवाशांनी ‘एक मोठा आवाज ऐकला आणि काही क्षणातच ऑक्सिजन मास्क खाली पडले. क्रू सदस्यांनी तातडीने प्रवाशांना मास्क लावण्यास सांगितले. काहीजण तर रडायला लागले आणि निरोपाची चिठ्ठी लिहू लागले, अशी माहिती प्रवाशांनी दिली. एका प्रवाशाने सांगितलं, ‘माझं शरीर इथे आहे, पण आत्मा अजूनही त्या आकाशात अडकला आहे. पाय अजून थरथरत आहेत.’ दुसऱ्या प्रवाशाने सांगितलं की, ‘त्या क्षणी वाटलं की आता सगळं संपेल… मी निरोपाची चिठ्ठी लिहायला सुरुवात केली.’