मस्त! एसटीचे लाइव्ह लोकेशन मोबाईलवर कळणार!

आपली एसटी पुठपर्यंत पोहोचली हे प्रवाशांना आता अॅपच्या माध्यमातून समजणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अॅप तयार केले असून त्यावर लालपरीचे लोकेशन कळेल. एसटी तिकिटावरील नंबरवरून ती बस स्टॅन्डवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. 15 ऑगस्टला हे अॅप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या एसटीच्या 14 हजार 500 बसमध्ये जीपीएस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात एसटी ही जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. राज्यभरात सध्या 50 हजार मार्गावर एसटीच्या सुमारे सवालाख फेऱया होतात. काही कारणांमुळे एसटी उशिरा आल्यास प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते, पण नव्या अॅपमुळे या समस्येतून प्रवाशांची सुटका होणार आहे.

12 हजार बसमध्ये जीपीएस यंत्रणा

राज्य परिवहन महामंडळाच्या अॅपच्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ समजणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या 12 हजार बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व बसमध्ये जीपीएस बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगला 15 टक्के सूट

महामंडळाच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱया प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जुलैपासून लागू असून 150 किमीपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱया आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुटीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे.