अनिल अंबानींचे कर्ज खाते फ्रॉड घोषित करणार, स्टेट बँक ऑफ इंडियाची कारवाई

अनिल अंबानी यांची आधीच अडचणीत असलेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या मागे आणखी एक शुक्लकाष्ठ लागले आहे. या कंपनीचे कर्ज खाते फ्रॉड घोषित करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. कंपनीला पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सने एसबीआयच्या कारवाईला दुजोरा दिला आहे. एसबीआयने पंपनीच्या कर्ज खात्याची फ्रॉड म्हणून तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून या बद्दलची माहिती आरबीआयला देण्यात येणार आहे. एसबीआयने डिसेंबर 2023, मार्च 2024 आणि पुन्हा सप्टेंबर 2024मध्ये कंपनीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.

कर्जाच्या अटींचे उल्लंघन का केले, स्पष्टीकरण नाही

कंपनीने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले. याबाबत एसबीआयने नोटीस बजावली होती. परंतु कंपनी स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्याचे एसबीआयने म्हटले आहे. त्यानंतर बँकेच्या फ्रॉड आयडेंटिफिकेशन कमिटीने अंतिम निर्णय घेतला. हे कर्ज फ्रॉड ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा समितीने केला आहे.