
शिवसेना-‘मनसे’कडून राज्यातील हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारताच सरकारने सपशेल माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. या विजयामुळे मराठी माणसाच्या एकजुटीची प्रचंड वज्रमूठ पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे आता 5 जुलै रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’ डोममध्ये विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनाबाबत आज शिवसेना-‘मनसे’च्या पदाधिकाऱयांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यामुळे शिवसेना-मनसेच्या एकत्रित मोर्चाऐवजी आता वरळीमध्ये मराठीच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार असल्यामुळे या मेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘वाजतगाजत या… आम्ही वाट बघतोय…’ असे आवाहनही दोन्ही पक्षांकडून करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वरळी येथील डोममधील तयारीचा आढावा घेतला. या वेळी शिवसेना आमदार ऍड. अनिल परब, आमदार सुनील शिंदे, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह ‘मनसे’चे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा
वरळीमध्ये दोन्ही पक्षांकडून मराठी विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी मराठी जन आणि इतर पक्षांच्या नेत्यांनीही मराठी जल्लोष सोहळ्याला उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाठिंबा देणाऱया सर्वांचे आभार
शिवसेना-‘मनसे’ने हिंदी सक्तीविरोधात जाहीर केलेल्या आंदोलनात अनेक पक्ष, संघटना आणि संस्थांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे या सर्वांचेच आभार दोन्ही पक्षांकडून मानण्यात आले असून विजयी जल्लोष मेळाव्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.