सरकारची चर्चा निष्फळ वाहतूकदारांचा संप सुरूच, अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम

राज्यातील अवजड वाहतूकदार संघटनांचा संप बुधवारी सुरूच राहिला. वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट करीत सरकारने वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र सरकारची भूमिका सुस्पष्ट नसल्यामुळे वाहतूकदारांनी संपातून माघार घेण्यास नकार दिला. दरम्यान, राज्यभरात ट्रक, टेम्पो, टँकरची वाहतूक बंद असल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

विविध मागण्यांसाठी तसेच ई-चलन प्रणालीमार्फत केल्या जाणाऱया दंड वसुलीच्या निषेधार्थ राज्यातील हजारो अवजड वाहतूकदार संपावर गेले आहेत. बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान मंडळ समिती कक्षामध्ये वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्र्यांनी वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मात्र चर्चेत सरकारच्या भूमिकेबाबत सुस्पष्टता नव्हती. त्यामुळे ठोस तोडगा निघेपर्यंत आमचा संप सुरूच राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी स्पष्ट केले.