…तर सफाई कामगारांचे ‘काम बंद’; कचऱ्याचे ढीग साचणार, दुर्गंधी पसरणार, मंगळवारपासून मुंबईत ‘नाक मुठीत’ घेऊन राहावे लागणार

महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे खासगीकरण करण्यासाठी निविदा काढल्यास मुंबईत मंगळवारपासून ‘काम बंद’ आंदोलन करून कचरा उचलणार नाही, असा इशारा सफाई कामगारांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. खासगीकरणाबाबत पालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. हे आंदोलन झाल्यास मुंबईत जागोजागी कचऱयाचे ढीग जमा होणार आहेत.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या खासगीकरणाचे प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मोटर-लोडर, सफाई कामगार आणि परिवहन खात्यामधील खासगीकरण होईल. मात्र कामगारांची भरती कंत्राटी पद्धतीने केल्यास कामगारांच्या नोकऱया जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसह सर्व संघटनांसोबत महत्त्वाची बैठक वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील अण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडली. या वेळी प्रत्येक संघटनेने खासगीकरणाला विरोध केला. या वेळी कंत्राटीकरणामुळे सध्या काम करणाऱया कामगारांची नोकरी जाणार असून त्यांच्यावर बेकारीची कुऱहाड कोसळणार असल्याचे कामगार संघटनांकडून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, सत्यवान जावकर, उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर, रमाकांत बने, मिलिंद रानडे, शेषराव राठोड, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

पालिका म्हणते…

बदलत्या परिस्थितीनुसार काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून काम सुरू आहे. प्रस्तावित कंत्राटी कामांमुळे एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही, पीटी केस बंद होणार नाही, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या वेळी सांगितले.

बुधवारी मंत्रालयावर धडक मोर्चा

पालिका प्रशासनाने मुजोरपणे खासगीकरणाचा प्रयत्न केल्यास 9 जुलै रोजी मंत्रालयावर धडक देणार असल्याचा इशारा कामगार संघटनांकडून देण्यात आला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल.