
मायट्रल झडप दुरुस्ती ही अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केईएममधील डॉक्टरांनी केली आहे. अत्याधुनिक झडप दुरुस्तीची ही शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी लातूरच्या रमाबाई या 66 वर्षांच्या महिलेचे प्राण वाचवले. या प्रक्रियेसाठी लागणारे क्लिप्स हे 20 लाख रुपये किमतीचे उपकरण अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. परदेशात यासाठी 35 लाख खर्च येतो. सध्या रमाबाई यांची प्रकृती उत्तम असून लवकर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल.
रमाबाई यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अँजिओप्लास्टी केली. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठीक होती. अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. आरोग्य तपासणीत त्यांच्या हृदयातील मायट्रल झडपेमध्ये गळती असल्याचे निदर्शनास आले. अखेर त्यांच्या छातीतल्या झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
अशी झाली शस्त्रक्रिया
केईएममधील हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन आणि त्यांच्या टीममधील डॉक्टरांनी रमाबाई यांच्यावर पारंपरिक शस्त्रक्रिया करण्याऐवजी मायट्रल झडप दुरुस्तीची अत्याधुनिक आणि कॅथेटरद्वारे केली जाणारी कमी आघाताची पद्धत निवडली. शस्त्रक्रियेत युनिट प्रमुख डॉ. चरण लांजेवार, अतिरिक्त प्राध्यापक डॉ. गिरीश सबनीस, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंकिता कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. आदिती परस्मू तसेच इकोकार्डियोग्राफी तज्ञ डॉ. गौरव शिंदे, डॉ. धीरज कुमार, डॉ. किरण राठोड, डॉ. पुण्यप्रताप कुजर तसेच ऍनेस्थेशियाच्या डॉ. संगीता उमपरकर, सीव्हीटीसीचे प्रमुख डॉ. उदय जाधव यांचा समावेश होता.