नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं

हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने अध्यादेश रद्द केला. तसेच शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याबाबतचं धोरण ठरविण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती इतर राज्यांतील त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. मात्र संघाच्या जवळच्या असलेल्या जाधव यांच्या नियुक्तीला सर्वत्र विरोध होत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही, असे राऊत यांनी ठणकावले. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र जाधव अर्थतज्ञ आहेत. ते रिझर्व्ह बँकेत होते, फायनान्स कमिशनला होते. त्यांना भाजपने राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा संघ परिवाराशी संबंध आहे. त्यांना देशाचे उपराष्ट्रपती व्हायचे होते आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्नही करत होता. अशा व्यक्तीला महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी नेमले जाते तेव्हा लोकांच्या मनात संशय येणारच.

अर्थात या समितीच्या अध्यक्षपदी नरेद्र जाधव आले काय किंवा भैयाजी जोशी आले किंवा दत्तात्रय होसबळे आले तरी महाराष्ट्र या समितीचा कोणताही अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही हे उलथवून लावू. महाराष्ट्राने आपली ताकद दाखवली आहे. हिंदी सक्तीच्या प्रश्नावर किंवा मराठीवरील अन्यायाच्या प्रश्नावर आम्ही आमची ताकद यापुढे दाखवू, असेही राऊत म्हणाले.

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर येणार

वरळी डोम येथे होणाऱ्या मेळाव्याची तयारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे दोन पक्ष करत आहेत. बाळी सगळ्यांना खुले निमंत्रण आहे. त्यानुसार जे येतील त्यांचे आम्ही स्वागतच करू. मेळावा यशस्वी व्हावा, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेचे आमचे सहकारी, मनसेचे प्रमुख नेते हे सगळे त्या तयारीसाठी मैदानात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर येणार असल्याने महाराष्ट्राला आकर्षण आहे. ते महाराष्ट्राला एक संदेश देतील. हा आनंदाचा क्षण असून राज्याच्या आयुष्यात नवीन पाडवा आणि दसरा उगवणार असेल तर लोकांची भूमिका असेल तर जास्तीत जास्त लोकांनी, सर्व पक्षातील मराठी नेत्यांनी उपस्थित रहावे असे खुले आवाहन केलेले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका सर्वत्र गेलेली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी काय पावले टाकायची ते पाहू, असेही राऊत म्हणाले.

भाजप म्हणजे ‘डरपोक’ लोकांची ‘डी गँग’, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांचा घणाघात

नारायण राणेंचा खरपूस समाचार

शिवसेना-मनसेच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. राणेंनी काय बोलावे आणि काय नाही हे त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्या व्यक्तीने दोन-तीन वेळा पक्ष बदललेला आहे. जी व्यक्ती स्वत:चा पक्ष चालवू शकली नाही. अशा व्यक्तीला महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही. भाजपात गेलेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र याच्यावर प्रवचन झोडण्याचा अधिकार नाही. राणे यांनी भाजपात जाऊन कोकणातील मराठी माणसाचे नुकसान केले आहे. नारायण राणे तुमच्यासारखे सगळे गुलाम नसतात. सगळे आपली चामडी वाचवण्यासाठी पक्ष बदलच नाही. काही स्वाभिमानी लोक आहेत आणि ती राहतील शेवटपर्यंत म्हणून महाराष्ट्र टिकेल, असेही राऊत यांनी ठणकावले.