प्रतीक्षा संपली! हायफाय घराचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचे गोरेगावातील 330 विजेत्यांना देकारपत्र

गोरेगाव प्रेमनगर येथील म्हाडाच्या पहिल्यावहिल्या हायफाय प्रोजेक्टमधील विजेत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून 330 विजेत्यांना बुधवारपासून म्हाडाने देकारपत्र पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे या विजेत्यांचे हायफाय घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

म्हाडाने 2030 घरांसाठी गतवर्षी 8 ऑगस्टला जाहिरात काढली होती. यात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या 1327 घरांचा देखील समावेश होता. गोरेगाव प्रेमनगर येथील 332 हायफाय घरे असलेल्या इमारतीचे बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिल किंवा मेपासून विजेत्यांना देकारपत्र पाठवण्याचे म्हाडाचे नियोजन होते.मात्र, जून उजाडला तरी ओसी न मिळाल्यामुळे विजेते घराच्या प्रतीक्षेत होते. आता ओसी मिळाली असून 330 विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

जीम, स्विमिंग पूल, पोडियम पार्किंग

म्हाडाच्या या प्रोजेक्टमध्ये जीम, स्विमिंग पूल, पोडियम पार्किंग अशा अलिशान सुविधा देण्यात आलेल्या आहेत. 39 मजली या टॉवरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 227 तर उच्च उत्पन्न गटासाठी 105 फ्लॅट आहेत. या घरांच्या किमती 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 33 लाख या दरम्यान आहेत.

शिवधाम कॉम्प्लेक्स, खडकपाडातील विजेते वेटिंगवरच  

प्रेमनगर येथील इमारतीला ओसी मिळाली असली तरी या लॉटरीतील मालाड पूर्व येथील शिवधाम कॉम्पलेक्स तसेच खडकपाडा येथील शिवनेरी सोसायटी या इमारतींना अद्याप ओसी मिळालेली नाही. त्यामुळे येथील 222 विजेते घराच्या प्रतीक्षेत आहेत.

पैसे भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत

विजेत्यांना 25 टक्के पैसे भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत मिळणार आहे किंवा 10 टक्के पैसे भरून बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी म्हाडाकडून एनओसी मिळेल. एखाद्या विजेत्याने पूर्ण किमतीचा एकत्रित भरणा केल्यास त्याला दहा दिवसात घराचा ताबा दिला जाईल.