
>> संजय कऱ्हाडे
कसोटी सामने जिंकण्यासाठी लढवय्या वृत्ती आवश्यक असते असं मी काल म्हटलं आणि नेमपं तेच कप्तान गिलने दाखवून दिलं. संयम, जिगर आणि हार न मानण्याचा बाणा त्याने सिद्ध केला. एकदा मी सुनील गावसकरांना विचारलं होतं, ‘सर्वोच्च दर्जावर धावा करण्यासाठी काय जरुरी असतं – तंत्र की संयम?’ त्याचं उत्तर होतं, ‘तंत्र, संयम आणि जिगर जरूरी. दम असावा लागतो.’ शुभमन गिलने तोच दम दाखवला. गिल चांगला फलंदाज आहे, पण भविष्यात महान फलंदाज बनण्याचा होराच जणू त्याने काल दिला.
शुभमनचे स्ट्रेट ड्राईव्हज मनोहारी होते. त्याचे कव्हर ड्राईव्हज स्टायलिश होते आणि स्क्वेअर कट्स नजाकतभरे. पुल्स आणि स्वीप्स खणखणीत. ऋषभ पंत अर्धी पंगत सोडून गेला असं मी काल म्हटलं. कारण त्यानेही संयम, लढाऊ वृत्ती दाखवली असती तर दुसऱया दिवशी तो शुभमनप्रमाणेच भुरके मारून पंचपक्वान्नावर ताव मारू शकला असता! शुभमनच्या या सुखावणाऱया, शाश्वती देणाऱ्या खेळीतून जाडेजाने स्फूर्ती घेतली. एक दमदार अर्धशतक नोंदवलं. शुभमनच्या साथीने द्विशतकी भागीदारी नोंदवली. वॉशिंग्टन सुंदरने मग त्याचीच री ओढली आणि साऱयाच हिंदुस्थानी चाहत्यांना आशेचा किरण नव्हे सूर्यच दाखवला. आपल्या हाती मोङ्गी धावसंख्या आहे. आता इंग्लिश फलंदाजांच्या काळजाला बोचणारी गोलंदाजी आपण करणं आवश्यक आहे. थोडक्यात, दुसऱया दिवशी कप्तान अन् त्याच्या शिलेदारांची विजिगीषु वृत्ती बाकीचे तीन दिवस दिसली तर आपले वारेन्यारे व्हायला हरकत नाही!