
राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे, असा सरकारवर हल्लाबोल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, असा गवगवा करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य समर्थन मूल्याने खरेदी केले गेले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने योजना आणली; आणि ते धान्य घेतल्यानंतर ते पैसे देणे भाग आहे. पण एक वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्याने शेती कशी करावी, हा प्रश्न आहे.
लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी स्वतःला औताला जुंपून घेतो आणि शेतकरी भगिनी त्याला हाकते आहे, असे चित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. लातूर जिल्ह्यातील ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणीय नाही. राज्यातील शेतकऱ्याने स्वतःला जुंपून घ्यावे, आणि मग नंतर सरकारने त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, त्याला बैलजोडी देऊन मदत करावी, त्यासाठी वाट बघावी का?
नाना पटोले पुढे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कापले आहेत ते पुन्हा जोडावेत. तसेच कमीत कमी बारा तास लाईट दिली पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीची भूमिका घेण्यात आली. मग या सरकारला काय अडचण आहे? अंबानींचे 48000 कोटी रुपये माफ होतात. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला 14000 कोटी रुपयांचे टेंडर देता. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यात भ्रष्टाचार झाल्याचे सांगितल्यावर तुम्हाला ते टेंडर रद्द करावे लागले. हजारो कोटी रुपये मूठभर उद्योगपतींना सरकार देते. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवतात? घोषणा केल्याप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी याच अधिवेशनात करा, नाहीतर सरकारच्या जुमलेबाजीला शेतकरी कधीच माफ करणार नाही.



























































