
तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर आज विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. राजकीय विधाने करणाऱ्यांना अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत विरोधकांनी तुपे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शून्य प्रहारात तो मुद्दा उपस्थित केला. गुरुवार आणि शुक्रवारच्या सकाळच्या सत्रात चेतन तुपे हे तालिका अध्यक्ष होते. तेव्हा विरोधकांबाबत त्यांनी अवमानकारक भाषा वापरली, असे वडेट्टीवार म्हणाले आणि त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी तुपे यांची काही वाक्ये वाचून दाखवत तुपे यांना विधानसभा अध्यक्षांनी समज द्यावी अशी मागणी केली.
शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, अध्यक्षांच्या आसनावर बसून तालिका अध्यक्षांनी अशी वक्तव्ये केली याचा अर्थ ती अध्यक्षांनीच केलेली आहेत आणि ती अध्यक्षांचीच भूमिका आहे असे मानले जाते. त्यामुळे तुपे यांना कडक शब्दांत समज दिली जावी. काँग्रेसचे नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र्य अशा विधानांमुळे कमी होते, अशी खंत व्यक्त केली.
राहुल नार्वेक यांनी घेतली गंभीर दखल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.