
नौदलाला पहिली महिला फायटल पायलट मिळाली आहे. आस्था पुनिया यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्या सबलेफ्टनंट म्हणून नौदलाच्या पहिल्या फायटर पायलट बनल्या आहेत. नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण आला आहे. केवळ नौदलासाठी नव्हे, तर समस्त देशवासीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
आतापर्यंत नौदलात महिला टेहळणी विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्याची जबाबदारी सांभाळत होत्या, परंतु आस्था पुनिया या पहिल्या महिला आहेत, ज्या लढाऊ विमान उडवतील. नौदलाने 3 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात ही माहिती दिली.
गोवा येथील इंडियन नेव्हल एअर स्टेशनवर दुसऱ्या बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्सच्या समारोप समारंभात आस्था पुनिया यांना त्यांचे सहकारी लेफ्टनंट अतुल कुमार धुल यांच्यासोबत प्रतिष्ठत विंग्स ऑफ गोल्डने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना रिअर अॅडमिरल जनक बेवली यांनी प्रदान केला. नौदलाने ट्विट करून म्हटलेय की, नेव्हल एव्हिएशनमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला असून आस्था या पहिल्या महिल्या फायटर पायलट असणार आहेत. नौदलाच्या या निर्णयाचे काwतुक होत आहे, तर आस्था यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कोणती जबाबदारी
- आस्था पुनिया यांना कोणते फायटर एअरक्राफ्ट सोपवले जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. नौदलाकडे काही खास लढाऊ विमाने आहेत, ज्यात मिग-29 के प्रमुख आहे. ही फायटर जेट्स आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत यांसारख्या एअरक्राफ्ट पॅरियर्सवरून उड्डाण करू शकतात.
- मिग-29 केची प्रमुख वैशिष्टय़े म्हणजे कॉम्बॅट रेंज 722 किलोमीटर आणि नॉर्मल रेंज 2346 किलोमीटर आहे. 450 किलोग्रामपर्यंतचे बॉम्ब, क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. ही फायटर जेट्स विशेषतः सागरी मोहिमांसाठी तयार करण्यात आली आहेत.