अंधेरीत अमेरिकन हायड्रोपोनिक गांजाचा मोठा साठा जप्त, दया नायक व पथकाची कारवाई; चार कोटींचा मुद्देमाल हस्तगत

अमेरिकन हायड्रोपोनिक गांजाचा साठा करून तो मुंबई व आजुबाजूच्या परिसरितील नशेबाजांना विकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा ड्रग्स माफियांना दया नायक व त्यांच्या पथकाने दणका दिला. पोलिसांनी वेळीच धडक कारवाई करत त्या तिघांना उचलले आणि त्यांच्याकडून चार कोटी किमतीचा हायड्रोपोनिक गांजा, 38 हजाराची रोकड, साडेतीन लाख किमतीचे पाच मोबाईल असा चार कोटी 10 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अंधेरीच्या जे.बी. नगर परिसरातील गोकुळ रेजन्सी इमारतीतल्या एका खोलीत मोठय़ा प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाचा साठा करून ठेवला असून लवकरच तीन ड्रग्स माफिया तो गांजा मुंबई व आजुबाजूच्या परिसरातील नशेबाजांना विकणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट-9ला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सचिन पुराणिक, सपोनि महेंद्र पाटील व पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे गोकुळ रिजन्सी इमारतीबाहेर सापळा लावला. मग तिन्ही ड्रग्स माफिया 303 क्रमांकाच्या खोलीत आल्याचे कळताच पथकाने तेथे धडक दिली. शुभ सिरोया (25), हर्ष चोक्सी (20) आणि सिद्धांत शेट्टी (25) अशा तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याजवळ चार किलो 57 ग्रॅम वजनाचा व चार कोटी पाच लाख 70 हजार किमतीचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा मिळून आला. शिवाय रोख रक्कम व महागडे पाच मोबाईलदेखील सापडले.

ड्रग्स पेडलर्स, नशेबाजांची तंतरली 

जप्त केलेला गांजा हे तस्कर शहरातील ठिकठिकाणच्या नशेबाजांना विकणार होते. पण त्याआधीच दया नायक यांनी त्यांच्या पथकासह ड्रग्स माफियांचा मनसुबा उधळून लावला. या कारवाईमुळे ड्रग्स पेडलर्स व नशेबाजांना दणका बसला आहे.