स्वप्न साकार झालं! हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघ 23 वर्षांनी AFC Women’s Asian Cup साठी ठरला पात्र

हिंदुस्थानच्या महिला फुटबॉल संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 23 वर्षांनी AFC Women’s Asian Cup चे तिकीट पक्क केलं आहे. थायलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हिंदुस्थानने थायलंडचा 2-1 असा पराभव केला आणि हिंदुस्थान आशियाई चषकासाठी पात्र ठरला. विशेष म्हणजे आशियाई कपसाठी पात्रतेच्या गटात हिंदुस्थानने पहिल्यांदाच अव्वल क्रमांक पटकावत आपला दबदबा पूर्ण स्पर्धेत दाखवून दिला.

आशियाई चषक पात्रता फेरीत पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने मंगोलियाचा 13-0 अशा धुव्वा उडवत स्पर्धेची अगदी थाटात सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पूर्व तिमोर या संघाचा 4-0 असा पराभव केला, तिसऱ्या सामन्यात इराकचा 5-0 आणि चौथ्या सामन्यात थायलंडचा 2-1 असा पराभव केला. चारही सामने जिंकल्यामुळे ब गटात हिंदुस्थानचा संघ 12 अंकांनी पहिल्या क्रमांकावर विराजमान राहिला. हाच विजयी जोश कायम ठेवत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आशियाई चषकामध्ये हिंदुस्थानचा संघ विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल. हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघाच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे देशवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.