
जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथे 29 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. जनाबाई मधुकर पवार यांचा मृतदेह सावरगाव तांडा शिवारातील विहिरीत आढळून आला. या मृत्यूमागे सासरच्या मंडळींचा सहभाग असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठा जमाव जमा केला आणि आरोपींना अटक झाल्याशिवाय शवविच्छेदनास नकार दिला.
चिंचोली काळे येथील जनाबाई यांचा विवाह सावरगाव तांडा येथील मुरलीधर पवार यांच्याशी झाला होता. त्यांच्या मागे मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. जनाबाई यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे, पीएसआय विठ्ठल राठोड यांच्यासह परभणी गुन्हे शाखेचे हवालदार जिया खान पठाण, चौधरी, वासलवार, मधुकर राठोड, घोगरे, घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींना अटक होईपर्यंत शवविच्छेदन न करण्याच्या भूमिकेवर नातेवाईक ठाम राहिले. सकाळी 10 वाजल्यापासून सायं. 5 वाजेपर्यंत नातेवाईकांनी रुग्णालयात ठाण मांडले होते. दरम्यान, चारठाणा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.























































