
मीरा-भाईंदर शहराचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरी येथील निसर्गसंपन्न डोंगर नष्ट करून मेट्रो कारशेड उभारण्याचा घाट सरकारने घातला आहे. डोंगरावरील कारशेडने जैवविविधता, पर्यावरण, हजारो पक्षी-प्राण्यांचा निवारा आणि स्थानिकांची शेती – बागायती नष्ट होणार असून याविरोधात 6 हजारांहून अधिक नागरिकांनी रविवारी डोंगरी ते चौकदरम्यान मानवी साखळी आंदोलन केले. विकासाच्या नावाखाली निसर्गावर वरवंटा फिरवणे बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
मीरा-भाईंदर मेट्रो 9 व मेट्रो 7 एसाठी भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मेट्रो स्थानकाजवळ मुबल क मोकळी जागा असताना एमएमआरडीएने सुमारे 7-8 किमी लांब भाईंदरच्या डोंगरी येथील डोंगरावर कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 12 हजार ४०० झाडे कत्तल केली जाणार असली तरी प्रत्यक्षात कत्तल होणाऱ्या झाडांची संख्या 15 ते 18 हजार इतकी आहे.
सामाजिक संघटनांचा सहभाग
डोंगरी दत्त मंदिरपासून ते डोंगरी, उत्तन, पाली व नंतर चौक गाव येथील मुख्य रस्त्याच्या कडेला हे आंदोलन केले. यावेळी निषेधाचे फल क, काळे झेंडे फडकवण्यात आले. डोंगरी, उत्तन, पाली, चौक, तारोडी, भाईंदर, गोराई, मनोरी आदी गावांतील मच्छीमार, शेतकरी, धारावी बेट डिनरीचे धर्मगुरू, मच्छीमार – शेतकरी संस्था, सामाजिक संस्था, डॉक्टर, पत्रकार, वकील, विद्यार्थी सहभागी झाले होते. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे यादेखील आंदोलनस्थळी उपस्थित होत्या. मुंबई व परिसरात 21 ठिकाणी आज डोंगरी कारशेडविरोधात निदर्शने केली गेली.