अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई

मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चाआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी ही कारवाई केली.

अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी 8 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सर्वपक्षीय मराठी मोर्चाीच हाक देण्यात आली होती. सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार होता. मात्र तत्पूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह मनसे आणि इतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी पोलिसांनी जाधव यांना मीरा-भाईंदर क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली होती. या कारवाईमुळे अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चाची परवानगी मिळते, मग मराठी माणसांना का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. मनसेकडून झालेल्या या मारहाणीनंतर, परीसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुनच निषेध व्यक्त केला. तसेच तेथील व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. या सर्व घडामोडीनंतर मराठी माणूस जागा झाला.

याच पार्श्वभूमीवर 8 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समविचारी संस्था, तसेच सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र प्रेमी यांच्या वतीने मीरा-भाईंदर येथे मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी ‘मराठी मोर्चा’ची हाक देण्यात आली होती. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली.