
पीडितेने घटनेची तारीख व वेळ न सांगणे हा मुद्दा गौण आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.
सत्यम झा, असे या आरोपीचे नाव आहे. पुणे येथे त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्याने याचिका केली होती.
न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ही घटना गेल्यावर्षी घडली असा पीडितेचा दावा आहे. मात्र या घटनेची तारीख व वेळ पीडितेने नमूद केलेली नाही. मला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी झाने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. पीडितेचा जबाब संशयास्पद नाही. पीडितेच्या जबाबाच्या विश्वासार्हतेवर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल दिले आहेत. परिणामी झाचा गुन्हा रद्द करता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
असे आहे प्रकरण
पीडिता तिच्या पतीसोबत राहते. झादेखील त्यांच्याच घरात राहत होता. पती घरात नसताना झाने विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला. याचा गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र पीडितेचा पतीसोबत वाद झाला आहे. त्याच रागातून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी विनयभंग केलेला नाही, असा झाचा दावा आहे.