38 वर्षांनंतर ‘कबड्डीतील किमयागार’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

कबड्डीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या एकापेक्षा एक अशा दिग्गज खेळाडूंचा थरारक खेळ जिवंत करण्याची किमया केलेले ‘कबड्डीतील किमयागार’ हे कबड्डीतील एकमेव संदर्भ ग्रंथ 38 वर्षांनंतर पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित या पुस्तकाच्या दुसऱया आवृत्तीचे प्रकाशन राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते शनिवार, 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

महाराष्ट्राने हिंदुस्थानला अनेक महान कबड्डीपटू दिले. त्यापैकी आपल्या चतुरस्र खेळाने मैदान गाजविणाऱया अनेक कबड्डीपटूंच्या व्यक्तिरेखा संदर्भ ग्रंथात शब्दांत जिवंत करण्यात आल्या आहेत. 1987 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील कबड्डीच्या प्रांतातले चढाईचे वतनदार, तसेच पकडी करणारे शिलेदार आणि उत्तम डावपेच लढविणारे कर्णधार यामध्ये आहेत. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडापासून ते अलीकडच्या काळातील कबड्डीपटूंच्या दमदार आणि जोरदार खेळाचे वर्णन या संदर्भ ग्रंथात अत्यंत सहजतेने करण्यात आले आहे. कबड्डीतील नव्या पिढीला स्फूर्ती देतील अशा मधू पाटील, शांताराम जाधव, वसंत सूद, राजू भावसार, बाबाजी जामसांडेकर, शपुंतला खटावकर, छाया बांदोडकर, नाबर भगिनी अशा सुमारे 81 जणांच्या व्यक्तिरेखा या पुस्तकात आपली किमया दाखवतील. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि समालोचक राणाप्रताप तिवारी या प्रकाशन सोहळय़ात अनेक दिग्गज कबड्डीपटूंच्या मुलाखती घेत कबड्डीचा सुवर्णकाळातील आठवणी ताज्या करणार आहेत.