
कल्याण, डोंबिवलीत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग झाले. समाजातील विविध घटकांना शिवसेनाच न्याय देऊ शकते असा विश्वास व्यक्त करत डोंबिवलीतील 200 हून अधिक कार्यकर्त्यांनी हाती भगवा घेतला. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
डोंबिवली येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात प्रवीण साळवी, कैलास सणस, शिबू शेख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गटातील 200 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षाचे विचार पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले, हा प्रवेश सोहळा म्हणजे डोंबिवलीतील जनतेचा ‘मातोश्री’वर असलेला विश्वास आहे. ही लाट भविष्यात आणखी प्रबळ होणार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, शहर सचिव सुरेश परदेशी, संजय पाटील, शाम चौगले, चेतन म्हात्रे, सुप्रिया चव्हाण, प्रियांका विचारे, आदित्य पाटील, रिचा कामतेकर आदी उपस्थित होते.
राजेश मोरेंनी पलावा पुलाजवळच घर घ्यावे !
या कार्यक्रमात दीपेश म्हात्रे यांनी पलावा पुलाच्या निकृष्ट कामावरून मिंधे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्यावर सडकून टीका केला. मोरे यांनी या पुलाची वारंवार पाहणी करून राजकीय नौटंकी केल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार राजेश मोरे यांनी आता पलावा पुलाजवळच घर घ्यावे, जेणेकरून त्यांना रोज पुलावर जाण्यास त्रास होणार नाही असे म्हणत खिल्लीही उडवली.