
अनेक महत्त्वाच्या खटल्यांत सरकारी वकील म्हणून सेवा देणारे व भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणारे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची सेवा फळास आली आहे. निकम यांची राष्ट्रपती कोटय़ातून राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
उज्ज्वल निकम हे अनेक वर्षांपासून कायदा क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्या विरुद्धच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. त्याशिवाय इतरही अनेक खटले त्यांनी हाताळले आहेत.
लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव
उज्ज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा मोठया मतांच्या फरकाने पराभव केला होता.
मोदी फोनवर म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून राज्यसभा नियुक्तीची माहिती दिल्याचे उज्ज्वल निकम यांनी आज सांगितले. ’राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी टाकू इच्छित आहेत. तुम्ही ती घ्याल का, अशी विचारणा मोदी यांनी मला केली. मी त्यास लगेचच होकार दिला. संभाषणाच्या सुरुवातीला त्यांनी ’मी मराठीत बोलू की हिंदीत?’ अशी विचारणा केली व सुरुवातीला माझ्याशी मराठीतच संवाद साधला, असेही निकम यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी ’एक्स’ पोस्ट करून सर्व नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले.
हर्ष वर्धन श्रिंगला, सदानंदन मास्ते, मीनाक्षी जैनही राष्ट्रपती नियुक्त सदस्य
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निकम यांच्यासह परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी हर्ष वर्धन श्रिंगला, इतिहासतज्ञ मीनाक्षी जैन आणि सी. सदानंदन मास्टर यांना राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज या संदर्भातील अधिसूचना काढली.