छत्री निजामपूर नव्हे किल्ले रायगड ग्रामपंचायत, निजामाच्या खुणा पुसल्या

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामकरण आता किल्ले रायगड करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभा घेत एकमताने हा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिह्यातील निजामाच्या खुणा कायमच्या पुसल्या गेल्या आहेत. हा ठराव मंजूर होताच अक्षरशः गावकऱयांच्या आनंदाचे नगारेच झडले. शेकडो ग्रामस्थ, महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, असा जयघोष केला. या विजयी जल्लोषाने इतिहासाची साक्ष देत उभे असलेले किल्ले रायगडाच्या परिसरातील कडेकपारे निनादून गेले.

महाराष्ट्रातील अनेक जिह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव, अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण करण्यात आले आहे. मात्र स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी

असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव छत्री निजामपूर असे होते. त्यामुळे हे नाव बदलून किल्ले रायगड करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. याबाबत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. यात महिलांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती. ग्रामसभा सुरू होताच नामकरण बदलाचा ठराव आला. त्यावेळी सर्वांनी एकमुखाने ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ असा नारा दिला. त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

जिह्याच्या कानाकोपऱयातून निर्णयाचे स्वागत

छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगडवाडी या तीन महसुली गावांचा समावेश आहे. या विशेष सभेसाठी या तिन्ही गावांतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लहान मुले, वृद्धदेखील ग्रामपंचायतीच्या आवारात तळ ठोकून होते. ‘किल्ले रायगड’ असा ठराव मंजूर होताच शिवरायांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. रायगड जिह्याच्या कानाकोपऱ्यातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.