दिंडोशी पाळणाघर अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कारवाई होणार – गृहराज्य मंत्री योगेश कदम

दिंडोशीतील संतोष नगरमधील पाळणाघरात बालकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिले.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या घटनेची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले की, दिंडोशीतील संतोष नगर भागात पाळणाघर चालवले जाते. त्यात अनेक बालकांना ठेवले जाते. आज त्यात सहा बालकांवर अत्याचार झाले. त्याची तक्रार दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. अशा माणसाला फाशी झाली पाहिजे. यात दिरंगाई न करता लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे. हे कृत्य करणाऱया नराधमाला फाशी देण्यासाठी फास्ट ट्रक कोर्टात केस चालवा. पुन्हा अशा घटना मुंबईत होऊ नये यासाठी सरकार काय काळजी घेणार आहे, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. यावर त्वरित योग्य कार्यवाही करावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. त्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिले.