
विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या हक्कांचे रक्षण करण्याऐवजी आपण सरकारला कसे वाचवतोय हे दाखवण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा या अध्यक्षांनी धुळीस मिळवली आहे, अशी टीका शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. विधान भवनाला लक्षवेधी भवन नाव द्या, सभागृहाच्या कामकाजाला पॉइंट ऑफ इन्फर्मेशन मंडळ म्हणून नाव द्या, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. ऊठसूट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायला लाजा वाटल्या पाहिजेत, असेही त्यांनी बजावले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 293 च्या प्रस्तावावरील भाषणात अनेक महत्त्वाच्या विषयांना त्यांनी स्पर्शही केला नाही. केवळ खोटं आणि खोटं बोलले. आदित्य ठाकरे एका बैठकीला गेल्याने राईट ऑफ रिप्लायसाठी मी उभा राहिलो. तो नाकारण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे. पण अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचाही अधिकार आहे, असे भास्कर जाधव यांनी निदर्शनास आणले. एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की कोरोनाच्या काळात खिचडी घोटाळा केला, पण खिचडीचे पंत्राट ज्याच्या नावावर आहे तो संजय माशेलकर आज शिंदेंच्याच सोबत आहे, त्याच्यावर कारवाई झाली नाही, सूरज चव्हाण यांना मात्र चौदा महिने जेलमध्ये टाकले गेले, असे जाधव म्हणाले.
सभागृहात अध्यक्ष महोदय म्हणतो तेव्हा सरकारकडून उत्तर अपेक्षित असते. तसे होत नसेल तर अध्यक्षांनी सरकार बरखास्त करावे आणि स्वतःच प्रश्नांची उत्तरे द्यावी. लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय? विधेयकावर का चर्चा होऊ शकत नाही, अध्यक्षांचे असे वागणे महाराष्ट्राच्या परंपरेला लाज आणणारे आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.