
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बेताल बडबड करणारे भाजप खासदार नारायण राणे यांची मुंबई सत्र न्यायालयाने सालटी काढली. राणे यांनी केलेली जाहीर विधाने हा राऊत यांची सार्वजनिक जीवनातील विश्वासार्हता व प्रामाणिकपणावर हल्ला आहे. ही विधाने निराधार, प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने केली गेली, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
‘संजय राऊत यांना मी खासदार बनवले, पैसे दिले’ अशी वक्तव्ये राणे यांनी 15 जानेवारी 2023 रोजी भांडुप येथे केली होती. त्यावरून संजय राऊत यांनी राणे यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला असून माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने 23 एप्रिल 2025 रोजी राणे यांना समन्स बजावले. त्या समन्सला राणेंनी आव्हान दिले होते. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बुधवारी फेटाळला आणि आज अकरा पानी आदेश जाहीर केला.
न्यायालयाचे निरीक्षण काय?
– संजय राऊत यांनी 2002 च्या मतदार यादीतील उताऱयासह कागदोपत्री पुरावे सादर केले, त्यामुळे ते नोंदणीपृत मतदार आहेत.
– राणेंची विधाने खोटी व निराधार आहेत. या विधानांमुळे राऊत यांची बदनामी झाली आहे.
– ‘संजय राऊत यांनी फसवणूक केली. त्यांना तुरुंगात जावे लागेल’ हे राणेंचे विधान मोघम होते. त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. हे विधान राजकीय मतभेदाचा भाग मानता येणार नाही.
दंडाधिकाऱयांचा समन्स योग्यच
दंडाधिकाऱयांनी राणेंना बजावलेला समन्स योग्यच आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे सत्र न्यायालयाने नमूद केले.