
घोडबंदर रोडवरील ऋतू एन्क्लेव्ह या सोसायटीमध्ये झाडांची छाटणी सुरू असताना ठेकेदाराने अत्यंत निर्दयीपणे कुऱ्हाडीने घाव घातले. या बेदरकार छाटणीमुळे पावसाळ्यात पक्ष्यांनी विणीच्या हंगामासाठी बांधलेली शेकडो घरटी कोसळली, असंख्य अंडी फुटली आणि 70 हून अधिक पक्षी ठार झाले. त्यात गायबगळा व बगळा प्रजातीच्या 50 पक्ष्यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या 30 हून अधिक पक्ष्यांना उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले आहे. आज घडलेल्या या संतापजनक कृत्याचा ठाण्यातील वन्य व पक्षीप्रेमींनी निषेध केला असून पक्ष्यांचा बळी घेणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
आनंदनगर भागात ऋतू एन्क्लेव्ह नावाची मोठी गृहनिर्माण संस्था आहे. या सोसायटीच्या आवारातील वृक्षांची छाटणी करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी महापालिकेकडून रितसर परवानगीदेखील घेण्यात आली. सोसायटीने त्यासाठी खासगी ठेका दिला होता. आज सकाळपासूनच वृक्षांची छाटणी सुरू असताना ठेकेदाराने एकामागून एक झाडांवर कुन्हाडीचे घाव घातले. आवाजामुळे काही पक्षी पळून गेले तर मोठमोठ्या झाडांवर पक्ष्यांनी घातलेली अंडी जमिनीवर कोसळली. असंख्य पक्ष्यांचा जागीच मृत्यू झाला. काही अंडी गटारात पडली. अनेक पक्षी रक्तबंबाळ होऊन झाडांवर लटकताना दिसत होते.
नियम धाब्यावर बसवले
ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडून सोसायटीला नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये वृक्ष छाटणी करताना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आणि अटीप्रमाणे वृक्ष छाटणी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने वृक्षांची छाटणी करण्यात आली. त्यात असंख्य पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला.
ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीच्या कमिटीने या सर्व प्रकाराबद्दल येत्या तीन दिवसात योग्य तो खुलासा करावा. तसेच कासारवडवली पोलीस ठाण्यात सोसायटीचे पदाधिकारी, मुजोर कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मधुकर बोडके (उपायुक्त, ठाणे पालिका)
ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये पक्ष्यांची हत्या झाल्याचे समजताच असंख्य ठाणेकर पक्षीप्रेमींनी धाव घेतली. तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना व ठेकेदाराला जाबही विचारला.
पक्षीप्रेमींनी या अमानुष कृत्याची तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे करताच वृक्षप्राधिकरण विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. घटनास्थळी अतिशय करुण दृश्य दिसत होते.
प्रशासनाने पक्ष्यांच्या हत्येची गंभीर दखल घेत ठेकेदार आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खासगी ठेकेदाराने पालिकेच्या संगनमताने या झाडांची छाटणी केली आहे. खरे तर पावसाळ्यापूर्वी छाटणी अपेक्षित होती, परंतु या झाडांची छाटणी जुलै महिन्यात करण्यात आली असून त्यामुळे पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रोहित मोहिते (पक्षीमित्र)