शिवसेनेच्या रणरागिणींची वसई पालिकेवर धडक; तुंबलेली गटारे, फुटपाथवरील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांचा विचारला जाब

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्यामुळे गटारे तुंबली आहेत. फेरीवाल्यांनी फुटपाथवर अतिक्रमणे केल्यामुळे नागरिकांना चालायलाही जागा नाही. शहरात बेकायदा बांधकामांची बजबजपुरी वाढली आहे. याशिवाय खड्ड्यात गेलेले रस्ते, पाणीटंचाई सोडवण्याबाबत पालिकेकडे वारंवार मागणी करूनही पालिका ती सोडवू शकत नसल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणींनी महानगरपालिका कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. करदात्या नागरिकांना कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने संताप आहे. याबाबत शिवसेनेने आयुक्तांना वारंवार निवेदन देऊनही नागरी समस्या मार्गी लागत नसल्याने माजी महिला जिल्हा संघटक नम्रता वैती यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या रणरागिणींनी थेट प्रभाग समिती ‘जी’ कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन केले. तुंबलेली व नालेसफाई न केलेली गटारे, पथदिव्यांचा अभाव, ओबडधोबड रस्ते व खड्डे, पदपथावरील अतिक्रमण, भूमाफियांचे अतिक्रमण, नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य व्यवस्था, शौचालय, सांडपाणी, धूरफवारणी या प्रश्नांवरून वैती यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

प्रभाग समिती ‘जी’मधील सहाय्यक आयुक्त, अधिकारी हे केवळ आपले खिसे भरत असून प्रभागातील लोकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे असा आरोपही त्यांनी केला. यावेळी शहर संघटक साधना चव्हाण, शहर संघटक ममता चव्हाण, विभाग संघटक सुनीता चव्हाण, विभाग संघटक भाग्यश्री सुतार, अण्णा सावंत, अजय सावंत यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडीच्या रणरागिणी उपस्थित होत्या.