
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनाच्या वतीने मतदारसंघ पुनर्रचना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकतेच जिल्हा परिषदेकडून मतदारसंघ जाहीर करण्यात आले. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल तालुक्यातील बानगे जिल्हा परिषद मतदारसंघाऐवजी म्हाकवे मतदारसंघ करावा अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा म्हाकवे ग्रामस्थांनी दिल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यासह राज्यात वाढीव मतदारसंघाची रचना करण्यात येत आहे. कागल तालुक्यात कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बोरवडे, सेनापती कापशी, नानीबाई चिखली असे पाच जिल्हा परिषद मतदारसंघ होते. यंदा लोकसंख्या वाढल्यामुळे तालुक्यात एक वाढीव मतदारसंघाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण करण्यात आला. पण भौगोलिक रचनेनुसार सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात म्हाकवे गावचा समावेश करण्यात आल्याने, नव्या मतदारसंघ पुनर्रचनेवरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कागल पंचायत समितीला पहिला सभापती देणाऱया म्हाकवे गावाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप उपसरपंच अजित माळी यांनी केला आहे. म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ न झाल्यास आम्हाला कर्नाटकात जाण्याची मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
म्हाकवे गावाला आहे राजकीय वारसा
कागल पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान गावातील तुकाराम पाटील यांना मिळाला होता, तर उपसभापती म्हणून गावचे सिद्धराम गंगाधरे यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. शिवानंद माळी यांच्या रूपाने जिल्हा परिषद सदस्य गावाला मिळाला आहे. तर, पंचायत समितीवर ए. वाय. पाटील यांनीही गावाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे म्हाकवे गावाला राजकीय वारसा मोठा आहे. म्हाकवेच्या आसपासच्या गावातील प्रमुख बाजार पेठेचे केंद्र असल्यामुळे गावाला स्वतंत्र जिल्हा परिषद मतदारसंघ मिळावा, अशी गावकऱयांची मागणी आहे.