
चमकोगिरीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात माध्यमांसमोर केलेली बेताल बडबड भाजप आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी नितेश राणे 28 जुलै रोजी माझगाव कोर्टात व्यक्तिशः हजर राहणार असून तशी हमी राणेंच्या वकिलांनी आज माझगाव दंडाधिकारी न्यायालयात दिली. दरम्यान या खटल्यामुळे राणे कायद्याच्या कचाट्यात सापडले असून बडबड करण्याच्या त्यांच्या वृत्तीला लगाम बसण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार. खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे निराधार दावे करीत नितेश राणे सैरभर बरळले होते. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केली. याप्रकरणी खासदार राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अॅड मनोज पिंगळे यांच्या मार्फत अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यावर आज शुक्रवारी महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.
यावेळी राणे यांच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले की, गेल्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते, हे वॉरंट हायकोर्टाने रद्द केले आहे. त्यामुळे नितेश राणे पुढील सुनावणीला व्यक्तिशः हजर राहतील. दंडाधिकाऱ्यांनी याची दखल घेत सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली.


























































