
आमदारकीच्या इतक्या वर्षांच्या टर्ममध्ये माझ्याकडून सभागृहात एकदाही असंसदीय शब्द वापरला गेला नाही. सभागृहाच्या कामकाजाविषयी व नियमांविषयी मी आग्रही असतो. उलट मी सभागृहात बोलायला लागलो की मला टोमणे मारायचे. गुरुवारी मी बाहेर मीडियाशी जे काही बोललो त्याचा खेद मलाही वाटला, मी तसे बोलायला नको होते, असे सांगत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी आज सभागृहात दिलगिरी व्यक्त केली.
विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनानंतर भास्कर जाधव यांना राईट टू रिप्लायवर भाषण करण्याची परवानगी गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर टीव्ही
चॅनेलशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
शुक्रवारी विधानसभेत मंत्री शंभुराज देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि भास्कर जाधव यांनी माफी मागावी किंवा अन्यथा त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली. इतर सदस्यांनीही भास्कर जाधव यांनी माफी मागण्याची मागणी केली.
त्यावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, की, मी सभागृहात बोलायला उभा राहिलो की मला टोमणे मारायचे. हे ठरवून होते का ते मला माहीत नाही. मी नियमाचा आग्रह धरतो आणि भांडतो; पण इतक्या वर्षांत मी कधीही सभागृहात असंसदीय शब्द वापरला नाही. त्यामुळे माझ्यावर कधीही माफी मागण्याची वेळ आली नाही. मी काल माध्यमांशी बाहेर बोललो ते मी घरी जाऊन टीव्हीवर पाहिले. आज हा विषय सभागृहात निघणार हे मला माहीत होते. त्यामुळे त्याच्याकडे पाठ न फिरवता मी त्याला तोंड देण्यासाठी थांबलो. पण काल माझ्याकडून मीडियाशी बोलताना शब्द गेला. ती चूक मी मान्य करतो असे भास्कर जाधव म्हणाले.
मी माफी मागितली पाहिजे. माझी चूक झाली. दिलगिरी व्यक्त करतो. त्यावरही मला जी काही शिक्षा करायची आहे ती करा, असे भास्कर जाधव म्हणाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेली भावना सदस्यांनी मोठय़ा मनाने स्वीकारावी आणि विषय संपवावा, असे आवाहन करून अध्यक्षांनी या विषयावर पडदा टाकला.