
>> स्पायडरमॅन
पुराणकथा, दंतकथा, लोककथा यांचा खजिना आपल्याकडे भरलेला आहे. या सर्व कथांमध्ये साप आणि नागाच्या कथांना एक विशेष स्थान आहे आणि या कथा खरा मानणारा एक मोठा वर्ग आहे. इच्छाधारी साप आणि नाग यांच्या कथा तर लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे इच्छाधारी साप आणि त्यांच्याकडे असलेला अद्भुत नागमणी याबद्दल आजदेखील जनमानसात एक पुतूहल आढळून येते. या संकल्पनेवर अनेक कथा रचल्या गेल्या, गाणी लिहिली गेली आणि त्यावर आधारलेल्या अनेक भाषांमधील चित्रपटांनीदेखील लोकांची गर्दी खेचली. सध्या बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये नागमण्याच्या अफवेने अशीच लोकांची गर्दी लोटली आणि प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली.
मुजफ्फरपूरच्या साहेबगंज क्षेत्रात ही घटना घडली आहे. इथल्या शाळेत शिकणाऱया एका विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेला एक चमकणारा दगड दिला आणि सांगितले की, तो तिला एका सापाने भेट दिला आहे. या मुलीने हा दगड भेट दिला त्याच्या दोन-चार दिवस आधीपासून शाळेच्या आवारात एक साप हिंडताना अनेकांना दिसला होता. त्यांनी शाळेच्या प्रशासनाला यासंदर्भात सावधदेखील केले होते. त्याच सापाने हा दगड आपल्याला दिला असल्याचा दावा या मुलीने शिक्षिकेपाशी केला. शिक्षिकेनेदेखील त्यावर विश्वास ठेवला आणि कोणालाही काही न कळवता गुपचूप तो दगड आपल्या घरी नेला.
दोन-तीन दिवसांनी ही चमकत्या दगडाची कथा मुलीच्या घरच्यांना आणि गावातील काही लोकांना समजली आणि बघता बघता बातमी गावभर झाली. शेकडोंच्या संख्येने लोक नागमण्याचे दर्शन घ्यायला शाळेच्या आवारात एकवटले. काही वेळात गर्दी इतकी वाढली की, शेवटी शाळा प्रशासनाला पोलीस बंदोबस्त बोलवावा लागला. गर्दी जमेपर्यंत शाळा प्रशासनालादेखील झालेल्या घटनेचा अंदाज नव्हता. यानंतर प्रशासनाकडून शिक्षिकेची चौकशी करण्यात आली त्या वेळी तिने तो दगड घरी नेल्याचे कबूल केले. हा मणी नागमणी असून तो सर्वांच्या दर्शनासाठी सार्वजनिक करावा यावर गावकरी अडून बसले होते. शेवटी पोलिसांनी तो दगड ताब्यात घेतला आणि तपासणीसाठी पाठवून दिला आणि गर्दी एकदाची पांगली.