
खराडी परिसरात झालेल्या पार्टीत दोघा जणांनी मद्यपान केल्याचे ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. डॉ. प्रांजल मनीष खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केले होते. दरम्यान, पार्टीत आरोपींनी ड्रग्जचे सेवन केले होते की नाही, याबाबतचा न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
आरोपींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱयांचा गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. खेवलकरसह 7 जणांना अटक केली आहे. आरोपींना 27 जुलैला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घेण्यात आले असून ससूनच्या प्राथमिक तपासणीनुसार आरोपी डॉ. खेवलकर आणि यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे.