
>> संजय कऱ्हाडे
अप्पलपोटे. म्हणजे स्वार्थी. फक्त आपल्यापुरता, स्वतःचा विचार करणारे. आपलं पोट भरलं की झालं. मग दुसरा उपाशी मरो वा पोटात जंत पडून, अप्पलपोटय़ांना शष्पाचा फरक पडत नाही! इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्स आणि त्याच्या साथीदारांनी ते अव्वल दर्जाचे अप्पलपोटे असल्याचं काल सिद्ध केलं…
लॉर्ड्स आणि मँचेस्टरला पराक्रमी कामगिरी करणाऱया स्टोक्सच्या कौतुकाचे आम्ही डोंगर बांधले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्याने त्याच्या कौशल्याने मेरू उभारले. पण एक कप्तान म्हणून मात्र स्टोक्स चिचुक्या छातीचा भासला. अगदीच पिचकवणी!!
राहुल आणि कप्तान शुभमन गिल बाद झाल्यानंतर स्टोक्स अन् इंग्लंड संघासाठी विजयाचं आसमान ठेंगणं झालं होतं. जणू सर्वांच्यातच विजयश्री संचारली होती. पण जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जिवाचं रान करून, तीळ-तीळ श्रम जोडून 203 धावांची नाबाद भागीदारी नोंदवून इंग्लंडच्या विजयाच्या फुग्याला टाचणी लावली. त्यांच्या विजयाच्या आभाळाची उंची अशक्य केली अन् स्टोक्स आणि त्याच्या साथीदारांच्या अप्पलपोटे असण्याचे पुरावे मिळाले…
एका क्षणी जाडेजा 89 तर वॉशिंग्टन 80 धावांवर नाबाद होते. स्टोक्सने त्या क्षणी सामना अनिर्णित ठरवण्याचा प्रस्ताव ठेवला. शतकाच्या तोंडावर असताना जाडेजाने त्यासाठी स्टोक्सला नकार दिला. खरं तर स्टोक्सने परिस्थिती ओळखून, दिलाचा मोठेपणा दाखवून क्रिकेटचा खेळ खरंच ‘सभ्य माणसं’ खेळतात असं दाखवून द्यायला हवं होतं. पण त्याने वाद घातला अन् पुढे वादविवाद केला. आधी म्हणाला, शतकच पूर्ण करायचं तर ब्रूकच्या गोलंदाजीवर करणार का? मग म्हणाला, ‘मला माझ्या गोलंदाजांना दमवायचं नव्हतं.’ अरे धोंडय़ा, शतकाजवळ पोहचेपर्यंत आणि हातून सुटत चाललेला सामना वाचवेपर्यंत आर्चर, वोक्स, कार्स, डॉसन, रूट आणि तुझ्याच नाकीनऊ आणले होते ना दोघांनी? तुम्हीसुद्धा तोपर्यंत विकेट्स घेण्यासाठीच आणि विजयासाठीच प्रयत्न करत होता ना? आमचे तळाचे फलंदाज खेळायला आल्यावर तू तुझ्या राणीला गोलंदाजीसाठी बोलावणार होतास का?
(विराटच्या भाषेत!) बेन स्टोक्स, तुला सांगतो, मी कप्तान असतो तर जाडेजा आणि वॉशिंग्टनला अंधार पडेपर्यंत खेळवलं असतं! जाडेजा आणि वॉशिंग्टन शाब्बास!
बेन, कसोटी क्रिकेट सभ्य अन् दिलदार माणसांनी खेळण्याचा खेळ आहे रे! इथे दिलफेक हवे असतात, फेकदिल नव्हे! असेल दिल, तर दार उघडं आहे; नसेल दिल, तर दार मोकळं आहे! आपण यावे!!