
सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीचे अनेक किस्से आतापर्यंत समोर आले आहेत. याच खाबुगिरीमुळे अनेकांना तुरुंगवारीही घडली. असाच एक प्रकार कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आहे. केआरआयडीएलमध्ये लिपिक राहिलेल्या कलाकप्पा निदागुंडी यांनी बनावट कागदपत्र बनवून कोट्यवधींची संपत्ती जमवली. छामेमारीनंतर त्याचा पर्दाफाश झाला आणि त्याला अटकही करण्यात आली.
कलाकप्पा निदागुंडी हे कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये लिपिक पदावर कार्यरत होते. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. या छापेमारीमध्ये 30 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.
कोप्पलमध्ये काम करणाऱ्या आणि फक्त 15 हजार रुपये मासिक पगार असलेल्या कलाकप्पा निदागुंडी यांनी 24 घरे, 40 एकर शेती, 4 प्लॉट, 4 लक्झरी गाड्या आणि मौल्यवान दागिने अशी कोट्यवधीची संपत्ती जमा केली होती. त्यांच्या घरातून 350 ग्रॅम सोने आणि दीड किलो चांदीही जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता कलाकप्पा निदागुंडी यांच्या, त्यांच्या पत्नी आणि पत्नीच्या भावाच्या नावावर होती, असेही तपासात समोर आले.
निदागुंडी आणि केआरआयडीएलचे अभियंते झेडएम चिंचोळकर यांनी 96 अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार केली आणि 72 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केला. याची माहिती मिळताच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवणाऱ्या सरकारी बाबुंच्या मालमत्तांवर छापे टाकले.
दरम्यान, कोप्पलचे आमदार राघवेंद्र हितनाल यांनी संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.