हिंदुस्थानी फुटबॉलचे खालिद जमील नवे गुरू

अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) हिंदुस्थानचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि सध्या इंडियन सुपर लीग संघ जमशेदपूर फुटबॉल क्लबचे व्यवस्थापक असलेले खालिद जमील यांची हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. एआयएफएफने याबाबत घोषणा केली आहे. खालिदने 2017 मध्ये आयझॉल फुटबॉल क्लबला आय-लीग विजेतेपद मिळवून दिले होते. 13 वर्षांत प्रथमच हिंदुस्थानच्या फुटबॉल संघाचा प्रशिक्षक म्हणून एका हिंदुस्थानी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.

जमील यांची एआयएफएफ कार्यकारी समितीने तीन सदस्यांच्या यादीतून निवड केली आहे. इतर दोन दावेदारांमध्ये हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टँटाईन आणि स्टीफन टाकाxविच यांचा समावेश होते. स्टीफन यांनी यापूर्वी स्लोवाकिया राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. महान स्ट्रायकर आयएम विजयन यांच्या अध्यक्षतेखालील एआयएफएफच्या तांत्रिक समितीने तीन उमेदवारांची यादी तयार केली होती. त्यातून जमील यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणारे शेवटचे हिंदुस्थानी सावियो मेडेरा होते. त्यांनी 2011 ते 2012 पर्यंत हे पद भूषवले होते. जमील यांच्या नियुक्तीनंतर मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन नेशन्स कप ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनंतर हिंदुस्थानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही स्पर्धा 29 ऑगस्टपासून ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे.