
>> ड़ॉ स्ट्रेंज
जादुई, साहसी जगातील सुपरहीरोंप्रमाणे साहसी नायिका तितक्या तशा दुर्मिळच. या साहसी नायिकांमधल्या कॅटवुमनने प्रेक्षकांना कायम भुरळ घातली. कॉमिक्समधून भेटणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवुमन वॉर्नर ब्रदर्सच्या ‘कॅटवुमन’ चित्रपटातून पडद्यावर अवतरली. तिच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट.
स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळे कॅटवुमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्समधून भेटीला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती 2004 साली वॉर्नर ब्रदर्सच्या ‘कॅटवूमन’ चित्रपटातून. कॅटवुमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.
चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमनपर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) ही सौंदर्य प्रसाधने बनवण्राया एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱया बुजऱया पेशन्स फिलिप्सवर यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱया प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याच्या तयारीने काम करत असते.
अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठडय़ावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱया डिटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्यदेखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.
एके रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण केल्यावर पेशन्स स्वतच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱया प्रॉडक्टमध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱया पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात. पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते… आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपात पुनर्जन्म होतो.
आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्टमधून तिच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळण्राया आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असण्राया प्राध्यापिकेशी होते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरूपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ती पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते. साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद्व आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱया बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षिली जात असते.
हळूहळू आता कॅटवूमन म्हणून जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ती कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटण्राया टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.