मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंना फडणवीसांच्या पायघड्या, देवाभाऊ म्हणाले, महाराष्ट्रात या तुमचे स्वागत करू!

हिंदीच्या सक्तीविरुद्ध मराठी माणसाने रान उठवले होते. त्यावेळी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदीला विरोध करणारा मराठी माणूस बिहारच्या पैशांवर जगतोय अशी गरळ ओकत मराठी माणसाचा अपमान केला होता. बिहारमध्ये या, पटक पटक के मारेंगे, असे आव्हानही दिले होते. त्याच दुबेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायघडय़ा घातल्या आहेत. मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या दुबेंचे स्वागत करू आणि त्यांना संरक्षणही देऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठीद्वेष्टय़ा निशिकांत दुबे यांच्याविरोधात मुंबई महाराष्ट्रात प्रचंड संताप आहे. महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी तर संसद भवनात दुबे यांना घेराव घालत जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या होत्या. मराठी भाषा आणि मराठी माणसाविरुद्धची भाषा सहन केली जाणार नाही असे त्यांनी दुबे यांना ठणकावले होते. त्यानंतरही दुबे यांची मग्रुरी कायम आहे. असे असताना फडणवीसांनी दुबे यांना कठोर संदेश देण्याऐवजी त्यांच्यासाठी पायघडय़ा घातल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र निशिकांत दुबे मुंबईत आले तर त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ असे म्हटले आहे. देशातील कुठलाही नागरिक महाराष्ट्रात आला तर त्याचे स्वागतच होईल, संविधानानेच तसा अधिकार दिला आहे आणि दुबे यांच्या संरक्षणाची सरकारची जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यावरून राजकीय वातावरणही तापले आहे.

भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची थुंकी चाटताहेत – संजय राऊत

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेवर खरमरीत शब्दांत टीका केली. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायघडय़ा घालण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर थुंकणाऱ्यांची त्यांना जास्त चिंता आहे. भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची थुंकी चाटत आहेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांचा समाचार घेतला.

येऊ तर दे, कसं स्वागत करायचं बघू – अविनाश अभ्यंकर

मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या वाचाळवीर खासदार निशिकांत दुबेंना पायघडय़ा घालणे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने दुबेंना माफी मागायला लावली असती तर आवडलं असतं. मराठी माणसाला का दृष्ट लावताय, ह्याला आवरा असं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगावं. दुबेंना महाराष्ट्रात येऊ तर दे, राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांचे स्वागत करू, असा इशारा अविनाश अभ्यंकर यांनी दिला.