
अहिल्यानगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून, खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे, असे खासदार लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी खोटय़ा गुह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून, शिवसेना उपनेते, दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही चौकशी न करता थेट ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असून, फिर्यादीचा सत्ताधारी पक्षाच्या राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी संबंध असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱया फिर्यादी व्यक्तीविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर, खासदार नीलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाच्या पक्षपाती आणि निवडक कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गृह विभागाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱयांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून, लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे, असे लंके यांनी म्हटले आहे.
यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रदीप परदेशी, युवा सेनेचे प्रशांत भाले, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, दीपक भोसले, राष्ट्रवादीच्या नलिनी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांवरील विश्वासार्हता डळमळीत
नगर शहरात घडणाऱया या घटनांमुळे पोलीस यंत्रणेवरील विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे जे कर्तव्य पोलीस दलावर आहे, त्याच संस्थेवर राजकीय दबावाखाली अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप सार्वजनिकरित्या होत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संपूर्ण तपशीलासह अहवाल गृह विभागास सादर करण्यात यावा, खोटे गुन्हे नोंदवणाऱया संबंधित अधिकाऱयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.