नितीन गडकरींचे नागपूरचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, फोन करणाऱ्या उमेश राऊतला अटक

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूरमधील घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उमेश राऊत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षात त्याच्या फोनवरून ही धमकी आली होती. गडकरी यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

आज सकाळी 8.46 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर फोन आला आणि थेट गडकरी यांचे घर बॉम्बने उडवून टाकणार असल्याची धमकी समोरच्या व्यक्तीने दिली. गडकरी हे नागपुरात असतानाच ही धमकी आल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने बॉम्बशोधक पथक पाठवून गडकरी यांच्या घराची तपासणी केली.

पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेला उमेश राऊत हा नागपूरच्या मेडिकल परिसरातील देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो. एका मित्रासोबत तो कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत भाड्याने राहतो. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.