ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांना सोपवली मोठी जबाबदारी, लोकसभेत TMC च्या नेतेपदी केली नियुक्ती

तृणमूल काँग्रेसने (TMC) सोमवारी आपले राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खासदारांच्या व्हर्च्युअल बैठकीत घेण्यात आली. या निर्णयानुसार, अभिषेक बॅनर्जी हे ज्येष्ठ खासदार सुदीप बॅनर्जी यांची जागा घेतील, ज्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असं सांगण्यात येत आहे.

अभिषेक बॅनर्जी हे डायमंड हार्बर मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला तब्बल सात लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. पक्षातील त्यांचे वाढते महत्त्व आणि प्रभाव यामुळे त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसकडे सध्या लोकसभेत 29 जागा आहे.